ऐरोलीत सलग चौथ्या दिवशी मासे मृत

ऐरोलीत सलग चौथ्या दिवशी मासे मृत


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

मागच्या आठवड्यात गोठीवली भागात मासे मृत पावल्याची घटना ताजी असताना आता ऐरोली खाडीकिनारी असलेल्या तलावातही दररोज शेकडो मासे मृत पावत आहेत. पाण्यात होणाऱ्या प्रदूषणामुळे हे प्रकार होत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला. यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लहान-मोठ्या रासायनिक कारखान्यांतील दूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने सलग चार दिवसांपासून ऐरोली आणि दिवा खाडीत शेकडो मासे मृत पावत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. यामुळे खाडीकिनारी असलेल्या तलावात मृत माशांचा खच पडला आहे. खाडीतील प्रदूषण वाढल्याने पाण्याचे तापमान वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे मासे मृत पावत असल्याचे स्थानिक मच्छिमार सांगत आहेत. मृत पावलेल्या माशांमध्ये काळा मासा, जिताडा, कोळंबी, बोईस, चिंबोरी, निवट्या अशा विविध प्रकारच्या माशांचा समावेश आहे. हे मासे घणसोली, तळवली, गोठीवली, दिवा कोळीवाडा आणि ऐरोली खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. दूषित सांडपाणी, दलदल तसेच जैविक कचरा अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारे हे मासे मृत्युमुखी पडत असल्याची येथील मच्छिमारांची तक्रार आहे.

ऐरोली कोळीवाड्यातील मच्छिमार, ऐरोली कोळीवाडा मच्छिमार सेवा संस्थेचे अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या खाजण तलावात सलग चार दिवसांपासून शेकडो माशांचा मृत्यू झाल्याने आज त्यांच्या कुटुंबावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. पावसाळ्यापूर्वी धनाजी पाटील यांनी त्यांच्या खाजण तलावात दीड ते दोन लाख रुपये किमतीची जिताडा आणि बोईस माशांची पिले पैदास होण्यासाठी सोडली होती. मात्र आता शेकडो माशांचा मृत्यू झाला. या भागातील पाण्याची गुणवत्ता घटल्यामुळे हा प्रकार घडत असून यामुळे येथील स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे, असे पाटील यांनी सांगितले. खाडीच्या पाण्याच्या प्रदूषणाची पातळी मोठी असल्यामुळे या भागात अत्यंत तुरळक मासे आढळतात. अनेक लहान-मोठे मासे मृत्युमुखी पडल्यामुळे उरलेसुरले मासे नष्ट होण्याची शक्यता आहे, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: