”साडेबारा टक्के’ जमिनींचे वाटप दीड वर्षांत पूर्ण करू’

”साडेबारा टक्के’ जमिनींचे वाटप दीड वर्षांत पूर्ण करू’


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांना किंवा त्यांच्या वारसांना करण्यात येणारे जमिनीचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोचे मुख्यालय असलेल्या, सिडको भवन येथील सातव्या मजल्यावरील साडेबारा टक्के योजना कार्यालयाचे स्थलांतर तळ मजल्यावर करण्यात आले आहे. या विभागाचे उद्घाटन सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी अजिंक्य पडवळ व अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नवी मुंबई विकसित करण्यासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोची १९७०मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने केली होती. नवीन शहर विकसित करण्यासाठी सिडकोने स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या प्रकल्पबाधितांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी साडेबारा टक्के ही योजना अस्तित्वात आली. या योजनेअंतर्गत नवी मुंबई प्रकल्पबाधितांना मोबदला म्हणून त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या साडेबारा टक्के विकसित जमीन देण्यात येते.

सिडकोकडून आजतागायत नवी मुंबई क्षेत्रातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील बहुतांशी प्रकल्पबाधितांना किंवा प्रकल्पबाधित व्यक्ती हयात नसल्यास त्यांच्या वारसांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पबाधितांना या योजनेअंतर्गत जमीन वाटपाची प्रक्रिया येत्या दीड वर्षात सिडकोकडून पूर्ण करण्यात येणार आहे.

सिडकोकडून द्रोणागिरी नोडमधील जमीन संपादित करण्याचे काम सुरू असून या जमिनींच्या मोबदल्यात तेथील प्रकल्बाधितांना जासई येथे विकसित भूखंड प्रदान करण्यात येतील. यासाठी जासई येथे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या दीड वर्षात या योजनेअंतर्गत बाकी असलेले जमिनीचे वाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने आखले आहे. यासाठी या योजनेतील प्रकरणे अधिक वेगाने मार्गी लावण्यात येणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

साडेबारा टक्के योजने संदर्भातील कामांसाठी सिडको मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीचे पडावे म्हणून, या योजनेचे सिडको भवन इमारतीत असलेले सातव्या मजल्यावरील कार्यालय तळ मजल्यावर स्थलांतरित केले आहे. नवीन कार्यालय हे सुसज्ज व अधिक प्रशस्त जागेत असून कार्यालयाबाहेर आसन व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प इ. सुविधा आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनाही हे नवीन कार्यालय अधिक सोयीचे ठरणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: