सह्याद्रीवासींची हिमालयावर यशस्वी चढाई; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची अभिमानास्पद कामगिरी

सह्याद्रीवासींची हिमालयावर यशस्वी चढाई; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची अभिमानास्पद कामगिरी


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : हिमालयातील गिर्यारोहणाचा हंगाम सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी यंदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. गेल्या आठवड्यात प्रियांका मोहिते आणि भगवान चवले यांनी ‘कांचनजुंगा‘ सर केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत जय कोल्हटकर या मुंबईकरासह कस्तुरी सावेकर या कोल्हापूरच्या कन्येने एव्हरेस्ट सर केले. तर, जितेंद्र गवारे या गिर्यारोहकाने ल्होत्से शिखर गाठून अष्टहजारी शिखर सर करण्याची पाचवी मोहीम कमी काळामध्ये फत्ते केली आहे. राज्यातील गिर्यारोहकांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

गोरेगावच्या शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या २७ वर्षांच्या जय कोल्हटकरने दोन दिवसांपूर्वी एव्हरेस्ट सर केले. शनिवारी तो बेस कॅम्पला दाखल झाला. गेली तीन वर्षे तो एव्हरेस्टसाठी सातत्याने सराव करत आहे. सन २०१४मध्ये शास्त्रीनगर येथे गणेशोत्सवात हिमालयीन गिर्यारोहणावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून प्रेरणा घेऊन त्याने ‘एव्हरेस्ट’चे ध्येय गाठल्याचे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले. जयला त्याची आई ज्योती कोल्हटकरांकडून गिर्यारोहणाचा वारसा मिळाला आहे. त्याला पुढे गिर्यारोहण क्षेत्रातच कारकीर्द करायची आहे.

कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर (२०) हिने शनिवारी माउंट एव्हरेस्ट सर केले. महाराष्ट्रातील एव्हरेस्ट सर करणारी कस्तुरी सर्वांत कमी वयाची महिला गिर्यारोहक असल्याची माहिती झिरपे यांनी दिली. कोल्हापूरमधील ती पहिली मुलगी असून, गेल्या तीन वर्षांपासून तिचे प्रशिक्षण सुरू होते. तिने याच हंगामात आधी ‘अन्नपूर्णा’ सर केले आणि त्यानंतर लगेचच ‘एव्हरेस्ट’ची तयारी केली. कोल्हापूरमधील करवीर हायकर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी तिच्या प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवले. चढाईसाठी आवश्यक असणारी ताकद तिच्याकडे असल्याचे ज्येष्ठ गिर्यारोहकांचे म्हणणे आहे. स्वतःचे लहानसे गॅरेज असलेल्या तिच्या वडिलांनी कस्तुरीच्या मोहिमांसाठी निधी गोळा करायला विशेष मेहनत घेतली. तिच्या यशामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहणाला अधिक उत्तेजन मिळेल, असा विश्वास झिरपे यांनी व्यक्त केला.

गिरीप्रेमीचे जितेंद्र गवारे (४२) यांनीही ल्होत्से शिखर गेल्या दोन दिवसांमध्ये गाठले आहे. व्यवसायाने गृह क्षेत्रामध्ये सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या गवारे यांनी वयाच्या ३५ वर्षांनंतर गिर्यारोहण क्षेत्रात भरारी मारायला सुरुवात केली आहे. आशिष माने यांच्यानंतर पाच अष्टहजारी शिखरे सर करण्याचा मान त्यांनी मिळवला. एव्हरेस्ट, अन्नपूर्णा, मन्सालु, कांचनजुंगा ही चार शिखरे त्यांनी गाठली. २०१९मध्ये कांचनजुंगा केल्यानंतर त्यांनी २०२१मध्ये अन्नपूर्णा, ‘एव्हरेस्ट’; तसेच मन्सालु सर केले. त्यानंतर ल्होत्से शिखर सर करून सर्वांत कमी कालावधीत पाच अष्टहजारी शिखरांचे ध्येय त्यांनी गाठले आहे. ते दिवसभरातून सहा ते सात तास व्यायाम आणि सराव करतात. या तिन्ही गिर्यारोहकांना गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीअरिंग येथे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण प्राप्त झाले आहे.

साताऱ्याची प्रियांका मोहिते आणि पुण्याच्या भगवान चवले यांनी गेल्या आठवड्यात कांचनजुंगा शिखर सर केले. चवले ३८ वर्षांचे आहेत. कांचनजुंगा सर केल्यानंतर प्रियांका ही पाच अष्टहजारी शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. या मोहिमांच्या यशामुळे सह्याद्रीतील अनेक गिर्यारोहकांना प्रेरणा मिळाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: