म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘ओबीसींचे आरक्षण ही राजकीय नव्हे, तर सामाजिक लढाई आहे. भाजपचे लोक या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात का गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना बुधवारी थेट सवाल केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवून घेतात. मग ओबीसींच्या हक्कासाठी इम्पेरिकल डेटा का देत नाहीत,’ अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणाचा इतिहास मांडून विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. महात्मा फुले ते राजर्षी शाहू महाराज, कालेलकर आयोग ते मंडल आयोग आणि २०११ सालची जातिनिहाय जनगणना ते २०१७ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात भाजपच्या लोकांनी त्रिस्तरीय चाचणीसाठी धरलेला आग्रह या घटनांचा मागोवा त्यांनी भाषणात मांडला. ‘ओबीसी आरक्षणाचा इतिहास, त्यासाठी कोणी लढा दिला, याची जाणीव विरोधकांनी ठेवावी. इतिहास जाणून घेतला तरच सर्वांना एकत्र येऊन काम करता येईल. भाजपच्या लोकांनी राज्याऐवजी आरक्षणासाठी दिल्लीत जाऊन आक्रोश केला तर आरक्षण मिळणे सोपे जाईल,’ असे भुजबळ म्हणाले. ‘मंडल आयोगानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आमच्या मागण्या मान्य करून एका महिन्याच्या आत राज्यात ओबीसींना आरक्षण लागू केले,’ असेही भुजबळ यांनी नमूद केले. ‘आधी रेशीमबागेतील संघाच्या कार्यकारिणीत सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा व मग आमच्यावर बोला,’ असे आव्हान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.