‘आम्ही अनिल परबांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, अशा कारवायांमुळे भाजपच खड्ड्यात जाईल’

‘आम्ही अनिल परबांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, अशा कारवायांमुळे भाजपच खड्ड्यात जाईल’


मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि शिवसेना अनिल परब (Anil Parab) यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. केंद्रातील भाजप सरकारने कितीही सूडाने कारवाई केली तरी आम्ही डगमगणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अनिल परब आमचे सहकारी आहेत. राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. अनिल परब आणि आमच्या अन्य सहकाऱ्यांवर जे आरोप लावले जात आहेत, त्यापेक्षा गंभीर गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. अशा कारवायांमुळे सरकार पडणार नाही, तसेच सर्व निवडणुकाही सुरळीत पार पडतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

अशा कारवायांमुळे भाजपच खड्ड्यात जाईल. महाराष्ट्रातील राजकारणाला इतके वाईट वळण कधी लागले नव्हते. तुमच्या हातात केंद्रीय तपासयंत्रणा आहेत म्हणून राज्यातील विरोधकांना नामोहरम करु, असे केंद्राला वाटत असेल तर तो समज चुकीचा आहे. शिवसेनेच मनोबल अशा कारवायांनी खच्ची होणार नाही. उलट अशा प्रत्येक कारवाईसोबत आमचे मनोबल वाढेल. आमच्याकडेही भाजपच्या नेत्यांविरोधात असंख्य पुरावे आहेत. आम्ही लवकरच टॉयलेट घोटाळ्यासह अन्य घोटाळा बाहेर काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई

शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात अखेर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केल आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अनिल परब (Anil Parab) यांचे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील घराचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले.

विशेष म्हणजे ईडीने अनिल परब यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा (Money Laundering) गुन्हाही दाखल केला आहे. कोणतेही ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय ईडीकडून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish