घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा निवडणूक लढवणार नाही; संभाजीराजेंची मोठी घोषणा

घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा निवडणूक लढवणार नाही; संभाजीराजेंची मोठी घोषणा


मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यानंतर अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी स्वराज्य बांधणीसाठी सज्ज झालो आहे. विस्थापित मावळ्यांना एकत्र करत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कालपासून मला अनेक आमदारांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की राजे काहीही झालं तरी आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. मात्र या निवडणुकीत घोडेबाजार होणार, हे मला माहीत आहे. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठी या निवडणुकीला सामोरं न जाण्याचा निर्णय मी घेतला आहे,’ अशी माहिती संभाजीराजेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली आहे.

माझ्या रक्तात ते नाही, माझ्या तत्वात ते नाही, मात्र मला बोलायचं आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडल्याचा आरोपही यावेळी संभाजीराजेंनी केला.

नक्की काय म्हणाले संभाजीराजे?

‘राज्यसभेचं गणित अवघड आहे, हे मला माहीत होतं. मात्र मागील १५ वर्षांपासून मी राजवाडा सोडून समाजासाठी जे काम केलं, त्याआधारे सर्व राजकीय पक्षांनी मला राज्यसभेसाठी पाठिंबा द्यावा, असं आवाहन मी केलं होतं. राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मी मुंबईत आलो. पुढे जे घडलं ते माझ्या रक्तात ते नाही, माझ्या तत्वात ते नाही, मात्र मला बोलावं लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी आवाहन करतो की तुम्ही माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोणत्याही स्मारकाजवळ या आणि त्यांचं स्मरण करून मी काही खोटं बोलत असेल तर मला सांगा. मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले आणि सांगितलं की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा, आम्ही उद्याच तुमची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करतो. मात्र मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं सांगून पक्षात प्रवेश करणं नाकारलं. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला आणि चर्चेसाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावलं. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपतींना वेगळं ठेवायचं नाही, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा असा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र मी पुन्हा अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार सुरू झाला होता, मात्र नंतर शब्द बदलण्यात आला,’ असा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: