असुरक्षितता! चालू रिक्षातून मधोमध बसलेल्या अभिज्ञा भावेचा मोबाईल चोरट्यांनी पळवला

असुरक्षितता! चालू रिक्षातून मधोमध बसलेल्या अभिज्ञा भावेचा मोबाईल चोरट्यांनी पळवला


मुंबई शहर आता सुरक्षित राहिलेलं नाही,असा अनुभव अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनं तिच्या फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमधून मांडला आहे. हा अनुभव मांडत असताना या शहरात राहणं सुरक्षित वाटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही केलं आहे….

अभिज्ञाची फेसबुक पोस्ट

‘खरं तर गेल्या काही दिवसांपासून मी सोशल मीडियाचा वापर करणं खूप कमी केलं आहे. परंतु मला आलेला एक धक्कादायक अनुभव सर्वांना कळावा यासाठी ही पोस्ट करत आहे. कदाचित तुमच्यापैकी काहीजणांनी हा अनुभव घेतलाही असेल. जर घेतला नसेल तर ही पोस्ट वाचून तुम्ही नक्कीच सर्तक राहून प्रवास कराल.’ असं म्हणत अभिज्ञानं तिच्या पोस्टमध्ये पुढं लिहिलं की, ‘माझा तो नियमित शूटिंगचा दिवस होता. माझं १०. ३० च्या आसपास पॅकअप झालं आणि मी घरी जायला निघाले.’

विवियाना ब्रिजवर घडला प्रकार

‘माझ्याकडे गाडी नसल्यानं इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणं मीदेखील सार्वजनिक वाहतुकीचा अर्थात रिक्षाने जाण्याचा पर्याय निवडला. पाच मिनिटांत मला रिक्षा मिळाली आणि घरी जायला निघाले. रिक्षा ठाण्यातील विवियाना ब्रिजच्या फ्लायओव्हरवर होती. फ्लायओव्हरवर असताना रिक्षाच्या डाव्या बाजूला बाईकवरून दोघंजण आले आणि काही कळायच्या आत त्यांनी माझा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मी रिक्षाच्या मधोमध बसले होते, तरीदेखील ते मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत होते.

रिक्षाचा पाठलाग करतच हिसकावून घेतला मोबाईल

‘बाईक आणि रिक्षाचा स्पीड ६० किलोमीटर इतका होता… हा सर्व प्रकार तीन ते चार सेकंद सुरू होता… मी मोबाईल वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु ते माझा मोबाइल हिसकावून घेण्यात यशस्वी ठरले…त्यांनी मोबाईल इतक्या जोरात हिसकावून घेतला की माझा हातही या झटापटीत दुखावला गेला. फोन चोरीला गेल्यानंतर मी सुन्न झाले. पण लगेचच भानावर आले आणि त्या बाईकचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या बाईकवर नंबर प्लेट नव्हती.’

बाईकचा पाठलाग करणं अयशस्वी

रिक्षा चालकानं त्या बाईकचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. बाईकवरून आलेले हे दोन्ही चोरटे विशीच्या आसपासचेच होते. एकूणच त्यांच्या कपड्यांवरून ते चांगल्या घरातील वाटली. परंतु अंधार असल्यामुळे मला त्यांचा चेहरा दिसू शकला नाही. या घटनेची पोलिसांकडे जाऊन तक्रार देण्याचा विचार माझ्या मनात आला परंतु खूप रात्र झाली असल्यानं घरी सुरक्षित जायला मी प्राधान्य दिलं.’

पोलीस ठाण्यात केली रितसर तक्रार

‘या घटनेची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. परंतु माझा सगळा महत्त्वाचा डेटा फोनमध्ये आहे. मोबाईलवरूनच आपण आपली महत्त्वाची काम करत असतो. मोबाईलमध्ये असलेल्या डेटाचा गैरवापर तर होणार नाही ना अशी सतत भीती मनात आहे. या घटनेनंतर मला माझ्याच शहरात असुरक्षित वाटू लागलं आहे. अशी असुरक्षित असल्याची भावना मी यापूर्वी अनुभवली नव्हती! दोन दिवसांनी जेव्हा मी सेटवर परतले तेव्हा मला त्याच भागात माझ्या इतर दोन सहकार्‍यांबरोबरही अशाच दोन घटना घडल्याचं समजलं. याचा अर्थ ठाण्यातली ही सामान्य परिस्थिती आहे किंवा ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तंतोतंत अशीच अवस्था आहे.’

अभिज्ञाचं मुख्यमंत्र्यांना केलं आवाहन

या पोस्टमध्ये अभिज्ञानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसां टॅग केलं आहे. त्यांना उद्देशून तिनं लिहिलं आहे की, ‘ मी ही पोस्ट लिहिण्याचं कारण म्हणजे याबाबत मुंबई पोलीस मुंबई जीआरपी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना ही परिस्थिती कळावी. या भागात ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना, सार्वजनिक व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांना सुरक्षित वाटणं आवश्यक आहे.

किमान नागरिकांना सुरक्षित वाटेल

मला नवीन फोन घेणं सहज शक्य आहे. परंतु अनेक सामान्य लोकांना ते परवडत नाही. आपल्या मालकीची वस्तू अशा प्रकारे हिसकावून घेतली जाणं ही धक्कादायक गोष्ट आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी कायदे अधिक कठोर करायला हवेत. तसंच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, आणि जर घडल्या तर त्या टिपण्यासाठी हायवेवर सीसीटीव्ही कॅमेर बसवले जावेत. त्यामुळे तरी किमान नागरिकांना सुरक्षित वाटेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish