एक व्यक्ती, एक झाड उद्दिष्टाकडे!

एक व्यक्ती, एक झाड उद्दिष्टाकडे!

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा , नवी मुंबई

महापालिकेने शहरात आतापर्यंत २५०हून अधिक लहान-मोठी उद्याने फुलवली आहेत. शहरात हिरवळ आहेच. दोन वर्षांपूर्वी शहरात चार व्यक्तींच्या मागे तीन झाडे होती. मात्र या वर्षी एका व्यक्तीच्या मागे एक झाड या उद्दिष्टाकडे आम्ही वाटचाल सुरू केली आहे, असे प्रतिपादन नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘महाराष्ट टाइम्स’च्या नवी मुंबई प्लस आवृत्तीचे अतिथी संपादक म्हणून बोलताना केले. ‘महाराष्ट टाइम्स’च्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त अभिजित बांगर यांनी ‘मटा’च्या मुंबईतील कार्यालयात नवी मुंबई प्लसचे अतिथी संपादक म्हणून भेट दिली. यावेळी वृत्तपत्रांविषयी असलेली त्यांची आस्था व्यक्त करत त्यांनी वृत्तपत्रांचे काम कसे चालते हेही जाणून घेतले. शिवाय नवी मुंबईसारख्या आधुनिक शहराच्या ध्येय धोरणांविषयी चर्चा केली. येत्या काळात नवी मुंबई महापालिकेत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येणार असून, त्यामुळे नवी मुंबई पालिका राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘नवी मुंबई प्लस’मधून या शहरातील विविध नागरिकांशी आदानप्रदान होते, असेही ते म्हणाले. नवी मुंबईत आव्हाने आहेत, मात्र सोयी-सुविधाही अधिक आहेत. स्वच्छतेमध्ये शहर पहिल्या क्रमांकावर आहे. देशात पहिला क्रमांक मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. माझी वसुंधरामध्ये आता महापालिका पहिली आली आहे. या नियोजनबद्ध आधुनिक शहराचे पुढचे भविष्यही उज्ज्वल असेल, असे त्यांनी अधोरेखित केले. नवी मुंबई ही सर्वार्थाने राहण्यास सुविधापूर्ण शहर म्हणून उदयास आली आहे व आता यापुढील टप्प्यात तेथे पर्यटनाच्या नव्या संधी कशा उभारता येतील, याची चाचपणी आम्ही सुरू केली आहे. तेथे प्राणीसंग्रहालय, मत्स्यालय या गोष्टींसााठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी, शहरातील आरोग्य सुविधा सुधारण्याबरोबरच नागरिकांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे म्हणून शहरात हिरवळ वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. स्थलांतरित रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांसाठी नवी मुंबई हे हक्काचे ठिकाण वर्षानुवर्षे आहे. आम्ही प्रथमच या शहराचे फ्लेमिंगो सिटी असे नामकरण केले व त्याचे महत्त्व ओळखले आहे. यापुढेही रोहित पक्ष्यांचा अधिवास टिकविण्यासाठी, तसेच त्यांचा अभ्यास करण्यासाठी नागरिकांना अधिक सुरक्षित सुविधा देण्याच्या आमचा मानस आहे, असे बांगर यांनी सांगितले. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हे इतर कोणत्याही स्मारकापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे आहे. तेथील ग्रंथांची मांडणी, पुतळ्याशिवाय छायाचित्रे व अन्य प्रतिकांनी बाबासाहेबांचे विचार व माहात्म्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. या स्मारकात यापुढे अधिक आधुनिक तंत्राचा उपयोगही केला जाणार आहे, असे ते म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *