वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पवार अपात्र. तर ग्रामसेवक श्री.बडे, श्री.पालकर, श्री.दिवकर, श्री.केंद्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई.

जनजागृती ग्राहक मंचाचे संतोष विचारे यांची लेखी तक्रार आणि ऍड.प्राजक्ता मंगेश माळी यांनी महत्वपूर्ण बाजू मांडल्यामुळे सुमारे दिड वर्षाने न्याय मिळाला.
रसायनी प्रतिनिधी: याबाबत सविस्तर वृत्त असे की , खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी व रायगड जिल्ह्यातील नव्याने होणाऱ्या नागरपालिकेमध्ये समावेश असलेली वासांबे ग्रामपंचायतीच्या बरबटलेल्या व भ्रष्टाचाराच्या कारभाराची चौकशी होण्याकरिता जनजागृती ग्राहक मंच रायगड चे संपर्क व प्रसिद्धी प्रमुख संतोष विचार यांनी दि.२५.०३.२०२१ रोजी ग्रामपंचायतीची सखोल चौकशी होण्याकरिता अर्ज केला होता व दोषी सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सदस्य यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९(१) नुसार अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली होती.
यानुसार गटविकास अधिकारी खालापूर यांना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. सदर अहवाल आल्यावर श्री.विचारे यांनी ऍड.प्राजक्ता माळी यांच्यामार्फत ग्रामपंचायतीचे संबंधित सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सदस्य यांच्यावर अपात्रतेच्या कारवाई करिता अर्ज केला होता.
सदर अर्जावर रायगड जिल्हा परिषदेत चर वेळा व विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाची सुनावणी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झाली होती. सदर प्रकरणात ग्रामपंचायत तर्फे ऍड.गजानन ढगे यांनी बाजू मांडली होती. श्री.विचार यांनी केलेल्या तक्रारीत रु.२,२१,५७०/- रुपायांची तफावत ग्रामपंचायत पासबुक व कॅशबुक मध्ये असल्याबाबत , त्यानंतर सुमारे १४ लाखाहून अधिक रक्कम थेट घरपट्टी वसुली, पाणीपट्टी वसुली मधून ग्रामनिधी न करता थेट खर्च केल्याबाबत यासह श्री.जयवंत म्हस्कर, श्री.संपत पारंगे व श्री.अनंत पारंगे याना बोगस वसुली ठेकेदार दाखवून वसूल झालेल्या पाणीपट्टी व घरपट्टीमधून ८ टक्के व ५ टक्के कमिशन प्रमाणे ३२,८७,०००/- रुपये बेकायदेशीर अदा केल्याबाबत, १६९ अनधिकृत घरांना, दुकानांना व टपऱ्या ना असेसमेंट लावल्याबाबत यासह सुमारे १६४ नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदारांना १कोटी ९० लेखा हुन अधिक रकमेची कामे देऊन ग्रामपंचायतीचे नुकसान केल्याची बाब ऍड.प्राजक्ता माळी यांनी युक्तिवादात मांडली होती.
श्री.विचारे यांच्या तक्रारीला यश येऊन दि.३०.०६.२०२२ रोजी विभागीय आयुक्त, कोकण विभाग श्री.विलास पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.ताई पवार यांना ग्रामपंचायतीच्या अधिकारपदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत तर संबंधित ग्रामसेवक श्री.बडे, श्री.केंद्रे , श्री. दिवकर, श्री. पालकर याना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्य सदस्यांचा ग्रामपंचायत कारभारात प्रशासकीय व अरहीक बाबतीत थेटसहभाग असेल तर त्या बाबतचा प्रत्येक सदस्यांवर चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. सदर प्रकरणात विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील यांनी दिलेल्या आदेशाबाबत श्री.संतोष विचारे नाखूष असून याबाबत लवकरच वरील अपिलीय प्राधिकरणाकडे लेखी तक्रार देण्यात येणार आहे असे श्री.विचारे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.