महापालिकेचा कंत्राटदार, अभियंत्यावर गुन्हा;वन विभागाच्या जागेत रस्त्याचे काम


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

वन विभागाच्या जागेत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू केल्याबद्दल वन विभागाने पनवेल महापालिकेचा कंत्राटदार आणि अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाची परवानगी न घेता रस्ता तयार करण्यास सुरुवात कशी केली, असा सवाल करत सोमवारी रस्त्याचे काम बंद करण्यात आले होते. यानंतर वन विभागाने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. महापालिका क्षेत्रातील खुटारी गावात सुरू असलेल्या रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे.

खुटारी गावातून जाणाऱ्या या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम महापालिकेने शिवकृपा डेव्हलपर्स या कंत्राटदाराला दिले होते. एकूण ३० लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्याचा ५० ते ६० मीटरचा भाग वन विभागाच्या हद्दीतून जातो. पनवेल महापालिकेने वनविभागाची परवानगी न घेता, तसेच जागेच्या मालकीची चौकशी न करता थेट काम सुरू केले होते. गावातील काही जागरूक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर, सोमवारी वन विभागाने रस्त्याचे काम बंद करण्यास सांगितले. जागेची मोजणी केली असता, महापालिकेचा कंत्राटदार आणि अभियंता अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वन विभागाचे पनवेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांनी घेतला. रस्ता बांधण्याच्या कामासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी कार्यादेश दिले असल्यामुळे, महापालिकेवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वन विभागाचे परिक्षेत्र वनअधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले.

पनवेल महापालिकेने यापूर्वीदेखील वन विभागाच्या जागेत बांधकाम केले असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. वन विभागाने कंत्राटदार आणि अभियंत्यांना समन्स बजावून, याबाबत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता सुधीर साळुंखे यांनी म्हणणे मांडले. महापालिकेने काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतलेल्या खुटारी गावात आधीपासूनच रस्ता होता, त्याच जागेवर आम्ही नवा रस्ता बांधत असल्याचे साळुंखे यांनी वन विभागाला सांगितले.

———————

वन विभागाकडे पालिकेने आपले म्हणणे मांडले आहे. पालिकेने वन विभागाच्या जागांची माहितीही मिळवली आहे. यापुढे वन विभागाच्या जागेत बांधकाम करण्यापूर्वी नियोजन केले जाईल. जुना रस्ता खराब झाल्यामुळे त्याच जागेवर नवीन रस्ता बांधण्यात येणार होता. पालिकेने वन विभागाच्या जागेत नवीन रस्ता काढलेला नाही.

– संजय कटेकर, प्रकल्प शहर अभियंताSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish