राजपथ नव्हे आता ‘कर्तव्यपथ’; राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटदरम्यानच्या मार्गाचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण

[ad_1]

राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटदरम्यानच्या मार्गाचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीः ब्रिटिश गुलामीच्या मानसिकतेचे प्रतीक बनलेल्या राजपथाला इतिहासजमा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटदरम्यानच्या ३.२ किलोमीटर लांबीच्या ‘कर्तव्यपथा’चे गुरुवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण केले. या वेळी इंडिया गेट शेजारी उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २८ फूट उंच ग्रॅनाइटच्या भव्य प्रतिमेचे मोदी यांनी अनावरण केले.

कर्तव्यपथावरील दीड तासांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी व्यासपीठावर किशन रेड्डी, मीनाक्षी लेखी, अर्जुनराम मेघवाल आणि कौशल किशोर हे मंत्री उपस्थित होते. हा सोहळा सायंकाळी सात वाजता सुरू झाला.

केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी प्रास्ताविक केले. ‘सत्तर वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने ज्या प्रकल्पाची कल्पनाही केली नव्हती, अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कर्तव्यपथाचे लोकार्पण केले जात आहे,’ असे पुरी म्हणाले. या सोहळ्यासाठी सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.

या सोहळ्यामध्ये मोदी म्हणाले, ‘जेथे गुलामीची प्रतिमा लागली होती, त्याच ठिकाणी नेताजी बोस यांच्या प्रतिमेसोबत आज नव्या, सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गाने चालला असता, तर आज चित्र खूपच वेगळे दिसले असते; त्यांचे योगदान विसरले गेले. यापुढे देशाच्या धोरणांवर नेताजींच्या स्वप्नांची छाप असेल. नव्या भारताचे सुंदर, भव्य आणि गौरवशाली चित्र आहे. देशाचा विचार आणि व्यवहार गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्त होत आहे. भारताचे आमचे स्वतःचे पथ, प्रतीक, लक्ष्य आणि संकल्प असतील. ही सुरुवात आहे. आम्ही भूतकाळाला सोडून भविष्यातील चित्रामध्ये नवे रंग भरत आहोत. येथे नव्या भारताच्या आत्मविश्वासाची आभा निर्माण झाली आहे. हा बदल केवळ प्रतीकांपुरता मर्यादित नसून तो देशाच्या धोरणांचाही भाग झाला आहे. त्यातून देशाला नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ भारताची निर्मिती करुनच उसंत घेऊ.’

आज गुलामीच्या आणखी एका प्रतीकापासून देश मुक्त झाला आहे. गुलामीचे प्रतीक किंग्जवे म्हणजे राजपथ कायमचा इतिहासजमा झाला असून, कर्तव्यपथाच्या रुपाने नव्या इतिहासाचे सृजन झाले आहे. राजपथाची भावना गुलामीची प्रतीक होती. पथच राजपथ असेल तर यात्रा लोकाभिमुख कशी असेल?

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

३.२ किलोमीटर

कर्तव्यपथाची लांबी

१०० एकर

कर्तव्यपथाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या हिरवळीचे क्षेत्रफळ

१६.५

लाल ग्रॅनाइट वापरू केलेला वॉक वे

आजपासून खुला

इंडिया गेटच्या दुतर्फा विविध राज्यांच्या फूड स्टॉलची रेलचेल असेल. त्यासाठी आठ वेंडिंग प्लाझा उभारण्यात आले आहेत. यापुढे कर्तव्यपथावर आलेल्या लोकांना घरुन किंवा बाहेरुन खाण्यासाठी अन्नपदार्थ आणता येणार नाही. तो शुक्रवारपासून सर्वसामान्यांसाठी खुला होत आहे.

असा असेल कर्तव्यपथ परिसर

– नव्या संसद भवनाचा समावेश असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग असलेला ‘कर्तव्यपथ’ १९ महिन्यांच्या आणि २४ तासांच्या अविरत कामानंतर सज्ज झाला.

– राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत ३.२ किमी अंतराच्या राजपथवर विजय चौकानंतर दोन्ही बाजूंनी शंभरहून अधिक एकरची विस्तीर्ण हिरवळ, कालवे तसेच उंच आणि घनदाट झाडे आहेत.

– सेंट्रल अॅव्हेन्यू पुनर्विकासानंतर या संपूर्ण परिसराला आधुनिकतेची जोड देत सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

– कर्तव्यपथावर येणाऱ्यांसाठी अकराशेहून अधिक कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

– पायी चालणाऱ्यांसाठी भुयारी मार्गांची सोय करण्यात आली आहे.

– संपूर्ण कर्तव्यपथावर ३००हून अधिक सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

– १९ एकरच्या क्षेत्रातील कालव्यांवर १६ नवे पुल बांधण्यात आले आहेत.

– लाल ग्रॅनाईट वापरून १६.५ किमी लांबीचा वॉक वे तयार करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *