राजकीय देणग्यांच्या बदल्यात रोख रक्कम; दोन हजार कोटींचा घोटाळा, मुंबईत छापेमारी

[ad_1]

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दलालीच्या बदल्यात राजकीय देणग्या रोखीने परत करणाऱ्या लहान राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत मुंबईत गुरुवारी आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. एकूण दोन हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्तिकर विभागाने देशभरात ८७ शहरांमधील जवळपास ११० ठिकाणी अशा छाप्याची कारवाई सुरू केली आहे.

देशभरातील जवळपास १९८ लहान राजकीय पक्ष नोंदणीकृत आहेत; पण त्यांना निवडणूक आयोगाची मंजुरी नाही. या लहान राजकीय पक्षांच्या आर्थिक हालचाली संशयास्पद असल्याचे निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला कळवले होते. त्यानुसार गुरुवारी देशभरात छाप्याची मोठी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील मुंबई व पुण्याचा समावेश होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईत आठ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यापैकी एका पक्षाचे कार्यालय धारावी झोपडपट्टीत होते. या पक्षाने काही संस्थांकडून १०० कोटी रुपयांची देणगी घेतली. त्यानंतर संबंधित संस्थांना ही रक्कम चार ते पाच टक्के दलाली कापून रोख स्वरुपात परत केले. अन्य एका पक्षाचे कार्यालय एका लहानशा खोलीत होते. या पक्षानेदेखील ८० कोटी रुपयांची देणगी स्वीकारून पाच टक्के दलाली कापून त्या व्यक्ती व संस्थेला उर्वरित रक्कम रोखीने परत केली. अशाप्रकारे अनेक लहान पक्षांनी रोख बदलून देण्यासाठी पाच टक्क्यांपर्यंत दलाली कापून घेतली व त्या दलालीच्या रकमेची कुठेही अधिकृत नोंद केली नाही. त्याआधारे मोठ्या प्रमाणात मिळकत लपवून कर चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यासाठीच देशभरात छाप्याची कारवाई सुरू आहे.’

औरंगाबादेतील छापे सुरूच

औरंगाबाद : शिवसेनेशी जवळीक असलेल्या एका बड्या व्यावसायिकाचे निवासस्थान व कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा टाकला. सलग दुसऱ्या दिवशीही (गुरुवारी) ही झाडाझडती सुरूच होती. पथकात ५० हून अधिक अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सुरक्षेसाठी तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या संख्येतेही आता वाढ करण्यात आली असून, यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, राजस्थानमधील माध्यान्ह भोजन घोटाळ्याबाबत आयटीने राजस्थानसह अनेक ठिकाणी छापे टाकले असून येथील व्यावसायिकावर झालेली कारवाई देखील त्यासंबंधितच असल्याचे समजते.

दरम्यान, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असून आतापर्यंत झालेल्या तपासणीतून नेमके काय पुढे आले, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *