Kolhapur: पाटील-महाडिक गटात अचानक तडजोड कशी झाली?; कोल्हापुरात चर्चा

Kolhapur: पाटील-महाडिक गटात अचानक तडजोड कशी झाली?; कोल्हापुरात चर्चा


म. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर

राज्य पातळीवर झालेल्या समझोत्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक गटातील संघर्षाचा धुरळा खाली बसला आहे. यापुढे आगामी जिल्हा बँक निवडणुकीत ही ‘समझोता एक्स्प्रेस’ कायम राहण्याची दाट शक्यता आहे. पण राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विधानपरिषदेची परतफेड होणार की, गटातटाचा वाद कायम राहणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले पंधरा वर्षे महाडिक आणि पाटील यांच्यातील संघर्ष सतत धुमसत आहे. लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेबरोबरच महापालिका, जिल्हा परिषदेसह गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या निमित्ताने तो संघर्ष अनेकदा उफाळून आला. अगदी ग्रामपंचायत पातळीपर्यंत पोहोचलेल्या या संघर्षाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अनेकदा बिघडले. इर्ष्येच्या राजकारणातून कोटयवधीचा चुराडा झाला. आजही तो सुरू आहे. हा वाद खून, मारामारीपर्यंत पोहोचल्याने या दोन गटाच्या संघर्षामुळे काहींचा राजकीय बळीही गेला. जिल्ह्याच्या विकासालाही तो मारक ठरत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळ नंतर विधानपरिषद निवडणुकीत पाटील आणि महाडिक गट आमने सामने आले होते. अमल महाडिकांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर संघर्षाला धार आली. मतांचा दरही वाढला. निवडणुकीच्या मैदानाबाहेरही एकमेकांना खिंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून आरोप अप्रत्यारोप सुरू झाले. एका गटाने एखादया मतदाराला पाकीट दिल्यानंतर त्याला अधिक जड पाकीट देत फोडोफोडीचे प्रयत्न सुरू झाले. यातून निवडणूकीत रंगत येत असतानाच अचानक ती बिनविरोधच्या वळणावर पोहोचली.

राज्यपातळीवर झालेल्या समझोत्यानुसार कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली. यामुळे पालकमंत्री पाटील बिनविरोध निवडून आले. त्यासाठी अमल महाडिक यांना माघार घ्यावी लागली. निर्णय राज्य नव्हे तर देशपातळीवर झाला. आदेश देशपातळीवरून आला. यामुळे निवडणूक बिनविरोध झाला. पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्षाला या निवडणुकीपुरता तरी स्वल्पविराम मिळाला. पण यापुढे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. राजाराम कारखान्याची लवकरच निवडणूक आहे. बाजार समितीची निवडणूकही तोंडावर आहे. यामुळे विधान परिषदेत राज्यपातळीवर सुरू झालेला समझोता एक्स्प्रेस जिल्हा पातळीवरही सुरू राहणार का याची चर्चा आता रंगली आहे.

वाचा: विधान परिषद निवडणुकीला नाट्यमय वळण; सतेज पाटील यांची बिनविरोध निवड

जिल्हा बँकेत भाजपची ताकद नसली तरी लढाई करण्याची तयारी जोरात सुरू आहे. पण जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या समझोत्याने यातील बऱ्याच जागा बिनविरोध होणार हे जवळजवळ नक्की आहे. यामध्ये पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कोरेंच्या पुढाकाराने बिनविरोधचा हा रथ गतीने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघर्ष टाळला जाईल असे वाटते.

वाचा: कोल्हापुरात ४८ गुन्हे असलेल्या भास्कर गँगला पोलिसांनी लावला मोक्का!

लोकसभा, विधानसभा, गोकुळ मधील विजयानंतर आता राजाराम साखर कारखाना उरला आहे म्हणत त्या दिशेने पालकमंत्री पाटील यांची घौडदौड सुरू आहे. पण विधानपरिषद निवडणुकीत नेत्यांच्या आदेशाला मान देत महाडिक यांनी एक पाऊल मागे घेतले. त्याची उतराई पालकमंत्री राजाराम कारखान्यात करणार का याची चर्चा आता वेगावली आहे. या दोन कुटुंबातील, गटातील संघर्ष टळावा म्ह्णून कदाचित जिल्ह्यातील नेतेच मध्यस्ती करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दोन गटातील वाद कमी होवून जिल्ह्यात शांततेचा वेगळा संदेश पोहोचणार आहे. यामुळे राज्य पातळीवर सुरू झालेला समझोता एक्स्प्रेस जिल्हा पातळीवरही कायम राहणार का याचीच आता उत्सुकता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: