Mumbai railway Residence: मुंबईत रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्यांना 7 दिवसात घर सोडण्याची नोटीस ABPMajha


मध्य रेल्वेवरच्या मुंब्रा स्थानकाजवळ ट्रॅकशेजारी राहणाऱ्या नागरिकांना नोटीस धाडून सात दिवसांत घरं रिकामी करण्याचे आदेश मध्य रेल्वेनं दिले आहेत. त्यामुळं या रहिवाशांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या या निर्णयाविरोधात स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून इशारा दिला आहे. या नागरिकांची आधी पर्यायी व्यवस्था करा आणि मगच त्यांची घरं रिकामी करा. अन्यथा आम्ही त्या नागरिकांच्या सोबत उभे राहू, असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मध्य रेल्वनं कल्याण, डोंबिवली आणि कळवा भागातल्या इमारती आणि चाळींमधल्या घरांना नोटीस दिली आहे. ती मध्य रेल्वेची जागा असून, या नागरिकांनी मध्य रेल्वेच्या जागेवर अनधिकृतपणे वास्तव्य केलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ट्रॅकला धोका निर्माण होऊ शकतो, असं नोटिशीमध्ये म्हणण्यात आलं आहे. दरम्यान, मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच ही कारवाई करण्यात येत आहे. तसंच सीएसटी, तुर्भे आणि कुर्ला भागातही मध्य रेल्वेकडून नोटीस देण्यात आल्या आहेत