पॉस्को कंपनी अंतर्गत इजिटेक कंपनीतील निलंबित केलेल्या १७ कामगारांचा आमरण उपोषणाचा इशारा.

माणगाव । तालुक्यातील विळे भागाड येथील पॉस्को कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या इजिटेक या कंत्राटी कंपनीत गेली ७ ते ८ वर्ष इमाने इतबारे काम करणाऱ्या १७ कामगार मुलांना कंपनीने कोणतेही कारण न देता निलंबित केल्याने आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरोधात या कामगारांनी दि.१४ मार्च २०२२ रोजी पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतची प्रत अधिक माहितीसाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह २२ जणांना पाठवून त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत प्रसार माध्यमांजवळ बोलताना या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकर यांनी निलंबित केलेल्या या १७ कामगार मुलांच्या पाठीशी आपण ठामपणे असून स्थानिकांवर होणार अन्याय आपल्याला कदापि सहन होणार नाही असे सांगत सर्वपक्षीय लोकांनी याकामी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे. निलंबित करण्यात आलेल्या या १७ कामगार मुलांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आमची आहे.

इजिटेक कंपनीतून निलंबित करण्यात आलेले कामगार रुपेश जाधव, सुबोध ठाकूर, जगदीश पाशिलकर, निकुल पोळेकर, सुनील शिंदे, परेश जंगम, प्रशांत दिवेकर,q भावेश जाधव, विशाल हर्णे, एकनाथ जांभरे, विवेक शिंदे, केतन भोसले, प्रणित म्हामुणकर, प्रणाल नलावडे, राहुल जोशी यांच्यासह एकूण १७ जणांनी आपल्या सहीनिशी प्रसार माध्यमांजवळ दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेल्या ७ ते ८ वर्षांपासून आम्हाला कंपनी ऍक्ट नुसार बऱ्याच सुविधांपासून वंचित ठेवल्यामुळे आमच्या न्याय हक्कासाठी कंपनीकडे काही मागण्या केल्या होत्या. यातील कंपनी व्यवस्थापनाने काही मागण्या मान्य केल्या परंतु कंपनी व्यवस्थापनाने काही दिवसातच सूड भावनेने आम्हा १७ कामगारांना कामावरून निलंबित केले आहे
सध्या आम्हाला बेसिक व महागाई भत्त्याच्या ५०% पगार देत आहेत.आम्हा काही गुन्हा नसताना कंपनीने आम्हाला तडकाफडकी कामावरून निलंबित केले. त्याबाबत आम्ही लेखी विचारणा केली असता आम्हाला खोटे दोषारोप पत्र देण्यात आले. तदनंतर आम्ही त्या चार्जशीटचे ७२ तासांच्या आत उत्तर दिले. परंतु चार्जशीट मधील तारखा बदलून मराठी भाषेतील चार्जशीट आम्हाला पुन्हा पाठवली.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि कंपनीने आम्हाला कायमचे घरी बसवण्याचे षडयंत्र रचले आहे. कंपनीने १७ डिसेंबर २०२१ रोजी कोणतेही कारण न देता आम्हा १७ कामगारांना निलंबित केले. त्यानंतर दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी आम्ही कामगारांनी कंपनीला कारणे द्या नोटीस पाठविली. त्याच दिवशी कंपनीने कामगारांना खोटी चार्जशीट दिली. दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी कामगारांनी चार्जशिटचे उत्तर मराठीतून दिले. कामगारांनी उत्तर दिल्यानंतर २६ फेब्रुवारी २०२२ रोजी कंपनीने खोटे आरोप लावीत मराठीतून चार्जशीट दिली.
अशा प्रकारे कंपनीत आम्ही सर्वजण इमाने इतबारे काम करीत असतानाही कंपनीने आमची अवहेलना करून आम्हाला निलंबित केले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीच्या या मानसिक त्रासाला कंटाळून आम्ही सर्व कामगार यांनी आपापल्या कुटुंबासमवेत पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी दि.१४ मार्च रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा निलंबित कामगारांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिला आहे